दडपे पोहे (Dadape Pohe)
आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पोहे खाल्ले जातात. पोहयांमध्ये कांदा,बटाटा, मटार घालुन फोडणीचे पोहे करतात. तसेच बहुतेक ठिकाणी दडपे पोहे, तेल- तिखट पोहे करतात. माझ्याकडे दडपे पोहे सगळ्यांना खुप आवडतात. जाडे पोहे किंवा पातळ पोहे वापरून वेगवेगळ्या प्रकारे दडपे पोहे केले जातात. आपल्या आवडीने त्यात भाजलेला पोह्याचा पापड किंवा उडीदाचा पापड घालतात. कुणी यात तेलाऐवजी लोणच्यातील तेल /खार तर कुणी फोडणीसुद्धा देतात . प्रत्येकाच्या पद्धतीत थोडा फार फरक असतोच. आज येथे माझ्या पध्दतीने करत असलेली ''दडपे पोहे' या नाश्ता प्रकारची रेसिपी देत आहे.
तयारीस लागणारा वेळ : १५-२० मिनिटे
४ माणसांकरिता
साहित्य:
- ३-४ वाट्या जाडे पोहे/पातळ पोहे
- १ बारीक चिरलेला कांदा
- १ बारीक चिरलेला टोमॅटो
- १ वाटी खोवलेला ओला नारळ
- थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
- १ टेस्पून लिंबाचा रस
- १/२ कच्चे वाटी तेल
- मीठ चवीनुसार
- १ टीस्पून साखर,
- १/२ टीस्पून लाल तिखट किंवा २-३ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
- भाजलेले २ पोहयाचे किंवा उडदाचे पापड (बारीक चुरून)
- १ वाटी नारळाचे पाणी / साधे पाणी
कृती :
१) एका भांड्यात जाडे पोहे घ्या. पोह्यांवर वाटीभर नारळाचे पाणी शिंपडुन पोहे थोडे ओलसर करा.(नारळाचे पाणी नसेल तर साधे पाणी सुद्धा चालेल.)
२) नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, चिरलेली कोथिंबीर, खरवडलेला नारळ, लाल तिखट, मीठ, १ टे. स्पून लिंबाचा रस, १/२ वाटी कच्चे तेल, साखर, भाजलेला पोहयाचा / उडदाचा पापड चुरून घाला.
३) सगळे साहित्य घालुन हाताने सारखे एकत्र करा.
४) डिशमध्ये सर्व्ह करताना थोडे कोथिंबीर व खोबरं घालून सजवा.
(पातळ पोहे वापरल्यास नारळाचे पाणी कमी प्रमाणात वापरावे. लाल तिखट किंवा हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे वापरावी.)
Yummy
ReplyDelete