फ्राईड चीझ-पनीर-कॉर्न मोमोज




मोमोज हा प्रकार तिबेट, नेपाळ, सिक्कीम व दार्जिलिंग येथे प्रसिद्ध आहे. यात एखादे सारण भरून त्याला मोदकासारखा आकार देऊन उकडुन किंवा तळून केला जातो. हा प्रकार व्हेज किंवा नॉनव्हेज असू शकतो. माझ्या पध्दतीची एक व्हेज मोमोजची रेसिपी देत आहे. हे मोमोज मी तळून करते. माझ्या घरी सगळ्यांना हे मोमोज खुप आवडतात.

साहित्य:

कव्हरसाठी:

  • १ कप गव्हाचे पीठ / मैदा ( आपल्या आवडीप्रमाणे घ्या)
  • थोडेसे मीठ
  • थोडेसे तेल
  • पाणी पीठ भिजवण्यासाठी

सारणासाठी:

  • १ वाटी मक्याचे दाणे
  • १/२ वाटी किसलेले पनीर
  • १/२ वाटी किसलेले चीझ
  • १/२ वाटी मैदा
  • ३ चमचे बटर
  • १/२ वाटी दूध
  • १ टी स्पून चिली फ्लेक्स
  • १ टी स्पून पिझा मिक्स / ओरिग्यानो
  • १/२ चमचा मिरेपूड
  • मीठ चवीनुसार
  • मोमोज तळण्यासाठी तेल

कृती :

१) एका भांड्यात कव्हरसाठी घट्ट कणिक भिजवा.

२) एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मक्याचे दाणे मीठ घालुन उकडा व चाळणीत उपसा.

३) चीझ व पनीर किसुन घ्या.

३) एका पॅनमध्ये बटर घाला त्यात मैदा घालुन २-३ मिनिटे मैदा भाजा व नंतर दुध घाला. मिश्रण चांगले मिक्स करून कोरडे करा. हे मिश्रण थंड होऊ द्या.

४) एका भांड्यात उकडलेले मक्याचे दाणे, किसलेले चीझ, पनीर, मैद्याचे मिश्रण, चिली फ्लेक्स, पिझ्झा मिक्स, मिरेपूड, मीठ हलक्या हाताने एकत्र करा.

५) आता भिजवलेल्या कणकेची लहान पुरी लाटा त्यात १ चमचा तयार सारण भरून मोदकाचा आकार द्या व तेलात तळा.

६) शेजवान चटणी बरोबर सर्व्ह करा.

  


Comments

Post a Comment

Popular Posts