बाफळीची भाजी

पावसाळ्यात मिळणारी 'बाफळी' एक रानभाजी आहे. काही ठिकाणी बाफळीची भाजी चिरून, उकडून त्यात हरभऱ्याची डाळ घालून  केली जाते परंतु आमच्याकडे थालीपीठाची भाजणी घालून ही भाजी केली जाते.  ही भाजी मला माझ्या सासूबाईंनी करायला शिकवली. बद्घकोष्ठता, पोटदुखी, जंत होणे यासारख्या त्रासांमध्ये बाफळीची भाजी लाभदायी असते असे माझ्या वाचनात आले आहे.

साहित्य:
  • २ बाफळीच्या मध्यम जुड्या
  • १-२ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
  • ३/४ वाटी थालीपीठ भाजणी
  • १/२ चमचा साखर
  • मीठ चवीनुसार
  • १/२ वाटी तेल
फोडणीकरिता:
  • १/२ वाटी तेल
  • १/४ चमचा मोहरी
  • १/४ चमचा हळद
  • चिमुटभर हिंग
कृती:

१) बाफळीची भाजी निवडून धुवून घ्या. धुतलेली भाजी बारीक चिरून घ्या.

२) एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा त्यात चिरलेली भाजी घाला व शिजवून घ्या.

३) शिजलेली भाजी चाळणीत उपसून ठेवा. गार झाल्यावर दोन्ही हातांनी दाबून भाजीतील  पाणी काढून टाका.

३) एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी, हळद, हिंग व हिरव्या मिरच्यांचे तुकडे घाला. त्यात पाणी काढून टाकलेली भाजी घालून परता. भाजी शिजल्यावर त्यात थालीपीठाची भाजणी, साखर व चवीनुसार मीठ घालून भाजी ढवळा. या भाजीमध्ये फोडणीत थोडे तेल जास्त लागते. भाजीवर २-३ मिनिटे झाकण ठेवावे.

४) तयार भाजी पोळीबरोबर सर्व्ह करा.






Comments