कच्छी दाबेली

आज कच्छी दाबेलीची रेसिपी देत आहे. कच्छी दाबेली करतांना बऱ्याच रेसिपी मध्ये कच्छी दाबेली मसाला वापरला जातो. मी ज्या प्रकारे करते त्यात कच्छी दाबेली मसाल्याऐवजी मी पावभाजी मसाला व गरम मसाला वापरून कच्छी दाबेली करते. गोल आकाराचे कच्छी दाबेलीचे पाव बाजारात मिळतात पण ते मिळाले नाही तर लादी पाव वापरून कच्छी दाबेली करू शकतो. कच्छी दाबेली करून बघा व मला तुमचा अभिप्राय नक्की कळवा.

साहित्य:
  • कच्छी दाबेली पाव /लादी  पाव  जरुरीप्रमाणे
  • ६-७ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
  • पाऊण वाटी  चिंचेचा कोळ ( एका वाटीत लिंबाएवढी चिंच घ्या व थोडेसे पाणी घालुन चिंचेचा कोळ काढुन घ्या.)
  • १/२ वाटी गुळाचे पाणी (गुळाचा खडा १/२ वाटी पाण्यात विरघळवा व गुळाचे पाणी करा.)
  • पावभाजी मसाला  १ टी . स्पून व गरम मसाला १ टी . स्पून किंवा आपल्याकडे कच्छी  दाबेली मसाला असेल तर तो वापरा. 
  • लाल तिखट १ टी . स्पून
  • तेल १/२ वाटी
  • बटर जरुरीप्रमाणे
  • मीठ चवीनुसार

गोड चटणी :  उकडलेला व बिया काढलेला खजुर १ वाटी ,१ टे. स्पुन चिंचेचे पाणी ,१/२ वाटी गुळाचे पाणी, थोडेसं जिरं ,थोडेसं मीठ व लाल तिखट इत्यादि एकत्र करून गोड चटणी वाटून घ्या.

तिखट चटणी :  निवडलेला पुदिना २ वाट्या, निवडलेली कोथिंबीर १ वाटी, ५-६ हिरव्या मिरच्या , थोडसं आलं, २-३ लसूण पाकळ्या, १ टे. स्पुन शेंगदाणे, १ चमचा लिंबूरस, मीठ चवीनुसार इत्यादि एकत्र करून तिखट चटणी वाटून घ्या.

सजावटीकरिता :
  • १ वाटी डाळिंबाचे दाणे
  • १ वाटी शेंगदाणे भाजुन घ्या, त्याची सालं काढुन तळा व शेंगदाण्याला थोडेसं  लाल तिखट लावा किंवा बाजारातुन मसाला शेंगदाणे आणा व वापरा . 
  • १ वाटी बारीक चिरलेला कांदा
  • १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती :

१) सर्व प्रथम बटाटे उकडुन घ्या व मॅश करून बाजूला ठेवा.

२) एका कढईत १/२ वाटी तेल तापवा. त्यात चिंचेचा कोळ व गुळाचे पाणी घालुन ढवळा. मिश्रण थोडे उकळु द्या .

३) त्यात आपल्याकडे दाबेली मसाला असेल तर तो किंवा पावभाजी मसाला व गरम मसाला १ टी. स्पून  प्रत्येकी  व १/२  टी. स्पून लाल तिखट घाला व मिक्स करा.

४) उकडुन मॅश केलेले बटाटे घाला. थोडीशी चिरलेली कोथिंबीर घाला. चवीनुसार मीठ घाला.

५) सगळे मिश्रण एकत्र करून २-३ मिनिटे एक वाफ द्या. एका खोल थाळीत मिश्रण काढून थापून घ्या.

६) त्यावर तळलेले शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालुन सजवा. 

७) लादी पाव घेऊन त्याला मध्ये कापुन तिखट व गोड चटणी लावा. थाळीतील १-२ चमचे तयार मिश्रण पावात भरा. थोडासा चिरलेला कांदा घाला. पावाला बटर लावा व तव्यावर भाजुन घ्या.

गरमा-गरम सर्व्ह करा. 

(कच्छी दाबेली करतांना गोड-तिखट व आंबट पणा करिता दिलेल्या  प्रमाणात आपल्या आवडीनुसार बदल करू शकता. अंदाजे १२-१५ कच्छी दाबेली तयार होतात.  )






Comments

Post a Comment

Popular Posts