खजूर लाडू

खजूर खाण्याचे बरेच फायदे आहेत. थंडीच्या दिवसात खजूर अवश्य खावा. खजूरामध्ये लोह, विटामिन्स व मिनरल्स आहेत. खजूर शक्तीवर्धक व रक्तवाढीसाठी सुध्दा उपयुक्त आहे असे माझ्या वाचनात आले आहे. आपण गोड चटणी करतांना खजूर वापरतो. उपासाच्या दिवशी माझी आई आम्हाला खजूर साजूक तूपात तळून देत असे तर कधी त्यातील बिया काढून त्यात बदाम भरून देत असे. खजूराचे लाडू मला खूप आवडतात. खजूर लाडूची रेसिपी देत आहे.

साहित्य:

  • ३ वाट्या खजूर (बिया काढलेला)
  • १ वाटी भाजलेले शेंगदाणे
  • ५-६ काजूचे तुकडे
  • ५-६ अक्रोडचे तुकडे
  • ५-६ बदामाचे काप

कृती:

१) प्रथम मिक्सरमध्ये थोडा बिया काढलेला खजूर व भाजलेले शेंगदाणे एकत्र करून बारीक करा. पुन्हा उरलेला खजूर व शेंगदाणे बारीक करून मिश्रण सारखे करून घ्या.

२) वरील मिश्रणात काजूचे तुकडे, अक्रोडचे तुकडे व बदामाचे काप घालून मिश्रण एकत्र करून घ्या.

३) तयार मिश्रणाचे मध्यम आकाराचे लाडू वळा.

तयार साहित्यात १०‌-१२ लाडू तयार होतात. खजूर गोड असल्याने साखरेची आवश्यकता भासत नाही. आवडत असल्यास १/२ वाटी भाजलेले खोबरे व १ चमचा भाजलेली खसखस घालू शकता. 


रेसिपी आवडली तर लाईक व कमेंट नक्की करा.




Comments