आळीवाचे लाडू

हळुहळू थंडी पडायला सुरुवात झाली आहे. थंडीच्या दिवसांत आळीवाचे लाडू खावेत. किराणा मालाच्या दुकानात सहजच मिळणारे आळीव आकाराने लहान असून, त्यांचा रंग लालसर असतो. आळीव बिया बुद्धीवर्धक असुन यात जीवनसत्त्व व खनिजांचा चांगला स्रोत असतो असे माझ्या वाचनात आले आहे. आज सगळ्यांना माहित असलेली व माझ्या आवडीची रेसिपी देत आहे. आवडली तर लाईक व कमेंट नक्की करा.

साहित्य:
  • १ वाटी आळीव 
  • दिड वाटी गुळ
  • १ नारळ
  • १ चमचा साजूक तूप 
  • १०-१२ बदामाचे काप

कृती:

१) एका भांड्यात आळीव नारळाच्या पाण्यात किंवा साध्या पाण्यात २-३ तास भिजत ठेवा. आळीव भिजतील इतकेच पाणी वापरा.

२) नारळ खोवून घ्या व गुळ चिरून ठेवा.

३) एका भांड्यात भिजवलेले आळीव, गुळ व खोवलेला नारळ एकत्र करून १ तास झाकून ठेवा.

४) वरील मिश्रणात १ चमचा साजूक तूप घालून मिश्रण सारखे करून घ्या. बदामाचे काप घालून तयार मिश्रण मध्यम आंचेवर परता (१०-१२ मिनिटे). मिश्रण घट्टसर व कोरडे झाले की, गॅस बंद करा. मिश्रण कोमट झाल्यावर लाडू वळून घ्यावेत.

वरील साहित्यात १४-१५ लाडू तयार होतात.






Comments

Post a Comment

Popular Posts