तांदुळाचे घावन




घावन करण्यासाठी खालील दिलेले साहित्य घेऊन पीठ दळुन ठेवावे. तयार पीठ १-२ महिने टिकते. घावन करतांना आपल्या आवश्यकतेनुसार तयार पीठ  घ्यावे. ब-याच घरात या प्रमाणे घावनचे पीठ करून ठेवतात. घावनं मुलांना व वृध्द व्यक्तींना देखील आवडतात. घावन पचायला हलकी असतात. आजारी माणसांना देखील खाता येतात.  मलाही घावन खुप आवडतात व झटपट तयार होतात. नुसते जिरं, हिरव्या मिरच्यांचे तुकडे व मीठ घावनाच्या पीठात घालुन पण घावनं करता येतात. घावन पीठ नसेल तर  २ वाट्या तांदुळाच्या पीठात १/२ वाटी साधा रवा , थोडेसे जिरं, मीठ, हिरव्या मिरचीचे तुकडे व बारीक चिरलेली कोथिंबीर व  पाणी घालून पीठ भिजवुन घावनं करता येतात.

घावनाचे पीठ:-

साहित्य:
  • १ किलो जाडे तांदुळ
  • १ लहान वाटी उडीद डाळ
  • १ चमचा मेथी
  • १ मुठ चणाडाळ

कृती:

वरील साहित्य एकत्र करून दळावे. आवश्यकतेनुसार वापरावे. 

घावना करिता:-
साहित्य:
  • दळलेले पीठ ३ वाट्या
  • ६-७ लसुण पाकळ्या
  • २-३ हिरव्या मिरच्या
  • १ चमचा जिरं
  •  थोडीशी कोथिंबीर
  • मीठ चवीनुसार
  • तेल आवश्यकतेनुसार
कृती:

१) ३ वाट्या दळलेल्या तयार पीठात लसुण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर व पाणी  घालुन सगळे मिश्रण १-२ मिनिटे मिक्सरमध्ये वाटा. ( हाताने एकत्र केले तरी चालेल. पिठात गुठळी ठेवू नका.) नंतर  त्यात १ चमचा जिरं व चवीनुसार मीठ घालून एकत्र करा. 

२) काईल / बीडाचा तवा तापवुन तव्याला तेल लावुन घावने घाला. घावन करतांना तेल सोडा व झाकण ठेवा. झाकण काढुन दुस-या बाजुने शेका.

३) चटणी, साॅस किंवा तुपाबरोबर सर्व्ह करा.





Comments

Popular Posts