मिनी उत्तपा

झटपट तयार होणारा व माझ्या मुलींच्या आवडीचा मेनू - मिनी उत्तपा. रंगसंगतीमुळे मिनी उत्तपा आकर्षक दिसतो त्यामुळे मुलं खूप आवडीने खातात. एरव्ही भाज्या खायला कंटाळा करणारी मुलं देखील मिनी उत्तपा आवडीने खातात. यात मी किसलेले गाजर, मक्याचे दाणे, ओलं खोबरं व बारीक चिरलेली कोथिंबीर वापरली आहे. तुम्ही यात बारीक चिरलेला पालक, रंगीत सिमला मिरच्या घालून सुद्धा करू शकाल. काही मुलांना कांदा आवडत नाही पण ज्यांना कांदा आवडतो त्यांना बारीक चिरलेला कांदा पण घालता येईल. अजून आकर्षक करण्यासाठी किसलेले पनीर/चीझ वापरू शकता. मुलं असा पदार्थ डब्यात देखील आवडीने नेतात. 

मिनी उत्तपा करण्यासाठी लागणारे साहित्य व कृती पाहुया . 

साहित्य :

  • इडलीचे पीठ आवश्यकतेनुसार 
  • १ किसलेले गाजर, 
  • १ वाटी मक्याचे दाणे 
  • १ वाटी खोवलेला नारळ  
  • थोडीशी  बारीक चिरलेली कोथिंबीर
  • मीठ चवीनुसार 
  • बटर किंवा तेल जरुरीप्रमाणे 

कृती : 

१) इडलीचे पीठ आवश्यकतेनुसार घेऊन त्यात चवीनुसार  मीठ घाला. 

२) नॉनस्टिक चा तवा तापवून छोटे -छोटे उत्तपे घालून त्यावर थोडेसे किसलेले गाजर, थोडे मक्याचे दाणे, थोडासा खोवलेला नारळ व थोडीशी  बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. कडेने १-२ छोटे  चमचे  बटर किंवा तेल सोडा. २-३ मिनिटांनी उलटा व पुन्हा बटर/ तेल सोडा. दोन्ही बाजूने नीट शिजवा आतुन शिजले पाहिजे. 

३) तयार उत्तपा नारळाच्या चटणी किंवा टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करा. 


Comments

Popular Posts