ब्रेड पकोडा

मस्त पावसात गरम-गरम खायची मजा काही औरच असते.  माझ्याकडे ब्रेड पकोडा घरातील सर्वांचा आवडता मेनू. वडा-पाव इतकाच खूप जणांना माहिती असणारा व आवडणारा प्रकार.  खूप दिवसांनी घरातील मंडळींनी ब्रेड पकोडा करायची फर्माईश केली. सगळ्यांनी  मस्त पावसात ब्रेड पकोडा व चटणीचा आस्वाद घेतला. अगदी थोड्या वेळात तयार होणारा तिखट व चमचमीत ब्रेड पकोडा. तुम्हालाही आवडत असेलच त्यासाठी  ब्रेड पकोडा करायची रेसिपी देत आहे.

साहित्य:
  • स्लाईस ब्रेड आवश्यकतेनुसार
  • ५-६ उकडलेले बटाटे
  • ५-६ हिरव्या मिरच्या
  • ५-६ लसुण पाकळ्या
  • थोडेसे आलं
  • थोडीशी कोथिंबीर
  • ब्रेड पकोडे तळण्यासाठी  तेल 
  • मीठ चवीनुसार

कव्हरकरिता:
  • चणाडाळीचे पीठ आवश्यकतेनुसार
  • थोडेसे लाल तिखट
  • थोडीशी हळद
  • थोडासा हिंग
  • मीठ चवीनुसार
  • १-२ चमचे गरम तेलाचे मोहन

हिरवी चटणी

साहित्य:

१ वाटी कोथिंबीर, ३-४ हिरव्या मिरच्या, ३-४ लसुण पाकळ्या, थोडेसे आलं, १ चमचा लिंबाचा रस, १ टे. स्पुन शेंगदाणे, मीठ चवीनुसार

कृती:

सगळे साहित्य एकत्र करून चटणी वाटा.

ब्रेड पकोडा करायची कृती:

१) ५-६ उकडलेले बटाटे मॅश करून घ्या. त्यात हिरव्या मिरच्या, लसुण पाकळ्या, थोडेसे आलं याची पेस्ट करून घाला. (आपल्या आवडीनुसार मिरच्या कमी- जास्त वापरा.) थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी हळद व चवीनुसार मीठ घाला व मिश्रण एकत्र करा.

२) चडाणाळीचे पीठ आवश्यकतेनुसार घ्या. त्यात थोडेसे लाल तिखट, थोडीशी हळद, थोडासा हिंग व
चवीनुसार मीठ घालुन मिश्रण एकत्र करा व पाणी घालुन भिजवुन घ्या. १-२ चमचे गरम तेलाचे मोहन घाला. (भजी करतांना जसे पीठ भिजवतो तसे पीठ भिजवुन घ्या.)

३) एका कढईत तेल तापत ठेवा. एका स्लाईसला तयार बटाट्याचे मिश्रण लावा व वरती दुसरा स्लाईस लावा व ब्रेड तिरका कापुन घ्या. तयार ब्रेड चणाडाळीच्या पीठात बुडवून गरम तेलात तळुन घ्या.

४) तयार ब्रेड पकोडा हिरवी  चटणी /केचप बरोबर सर्व्ह करा.




Comments

Popular Posts