कढण

'कढण' एक पारंपरिक व पौष्टिक प्रकार. आपण याला एक 'भारतीय सुप' म्हणू शकतो. काही जण याला ' कळण' सुध्दा  म्हणतात. चना चाट करण्यासाठी मी जास्त पाणी घालून हरभरे (अख्खे चणे) उकडून घेतले.  उरलेल्या पाण्याचे 'कढण' केले, असेच 'कढण' आपल्याला इतर कडधान्ये उदा. मुग, मटकी, चवळी, वाल वापरून करता येऊ शकते. कडधान्ये शिजवतांना जास्त पाणी घालावे, जास्तीचे पाणी एका पातेलीत काढून मस्तपैकी 'कढण' करावे आणि गरम-गरम प्यावे. करायला अगदी सोपे व लागणारे साहित्य घरात सहज उपलब्ध असते. पाहूया 'कढण' करायची रेसिपी.

साहित्य:

  • ४ वाट्या शिजवलेल्या कडधान्यांचे पाणी
  • १/२ वाटी ताक
  • १ चमचा साखर 
  • चवीनुसार मीठ 
  • थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर 
फोडणीकरिता :

  • १ टेबलस्पून तेल/साजूक तूप 
  • थोडीशी मोहरी, थोडसं जिरं, चिमुटभर हिंग 
  • ५-६ कडिपत्याची पानं 
  • १ हिरवी मिरची चिरलेली 

कृती:

१) एका पातेल्यात शिजवलेल्या कडधान्यांचे पाणी घ्या. त्यात साखर व चवीनुसार मीठ घालून पाणी गरम करा.

२) एका छोट्या कढईत तेल तापवून त्यात मोहरी, जिरं, हिंग, कडिपत्याची पानं व हिरव्या मिरचीचे तुकडे घालून फोडणी करा.

३) तयार फोडणी पातेलीतल्या पाण्यात घाला. पाणी खुप उकळू नका. त्यात १/२ वाटी ताक घालून मिश्रण एकत्र करून घ्या. आवश्यकतेनुसार पुन्हा थोडे ताक वापरले तरी चालेल.

४) बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम-गरम सर्व्ह करा.




रेसिपी  आवडली तर लाईक व कमेंट नक्की करा. 

Comments

Post a Comment

Popular Posts