कर्टुल्याची भाजी

पावसाळ्यात मिळणा-या रानभाजी पैकी एक भाजी म्हणजे कर्टुल. ‘कंटोळं’ या नावानेही  ही भाजी ओळखली जाते. झाडाझुडुपांत वाढलेल्या कर्टुल्यांची भाजी त्यातील बिया काढून, चिरून व ओला नारळ घालून परतून केली जाते. पावसाळ्यात आवर्जून ही भाजी मी करते. संधिवाताच्या तसंच पित्ताच्या विकारांवर ती अत्यंत लाभदायी ठरते तसेच रक्तशर्करा नियंत्रित करण्यासाठी कर्टुली गुणकारी आहेत असे माझ्या वाचनात आले आहे. या भाजीची रेसिपी देत आहे. 

साहित्य: 



  • २५० ग्रॅम कर्टुली
  • १-२ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
  • १/२ चमचा साखर
  • १/२ वाटी खोवलेला नारळ
  • मीठ चवीनुसार

फोडणीकरिता:

  • २ टेबलस्पून तेल
  • १/४ चमचा मोहरी
  • १/४ चमचा हळद
  • चिमुटभर हिंग

कृती:

१) प्रथम कर्टुली धुवून घ्यावीत. देठं काढून मधोमध चिरून घ्या. मोठ्या बिया असतील तर काढून टाका व कर्टुली उभी चिरून घ्या.

२) एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी, हळद, हिंग व हिरव्या मिरच्यांचे तुकडे घाला. त्यात चिरलेली कर्टुली घाला. त्यात साखर व चवीनुसार मीठ घालून भाजी ढवळा. कढईवर एक झाकण ठेवून भाजी वाफवा.

३) भाजी शिजल्यावर त्यात खोवलेला नारळ घालून भाजी ढवळा.

४) पोळी बरोबर सर्व्ह करा.




रेसिपी आवडली तर लाईक व कमेंट नक्की करा.

Comments

Popular Posts