पावट्यांची उसळ

महाराष्ट्रात पावटे व कडवे वाल खाल्ले जातात. पावटे म्हणजे पांढरे वाल तर कडवे वाल थोडे लालसर असून चवीला थोडे कडसर लागतात. पावट्याची/ वालाची उसळ, वालाचे बिरडे, डाळींब्या अश्या वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाणारी व मराठी माणसाला अत्यंत आवडणारी पाककृती. पावटे किंवा कडवे वाल वापरून पुढील पध्दतीने उसळ करता येते. विशेष म्हणजे कांदा व लसूण न वापरता केली जाते व पटकन तयार होते.

साहित्य:

  • २ वाट्या पावटे
  • १ वाटी खोवलेला नारळ
  • १-२ आमसूलं
  • २ टीस्पून गोडा मसाला
  • २ टीस्पून गूळ

फोडणीकरिता :

  • तेल ३ टेबलस्पून
  • १/४ चमचा मोहरी
  • १/४ चमचा हळद
  • २ टी स्पून तिखट(आवडीनुसार लाल तिखट कमी-जास्त प्रमाणात वापरा.)
  • मीठ चवीनुसार

कृती:

१) प्रथम पावटे ७-८ तास भिजवून त्याला मोड येण्याकरिता चाळणीत उपसून ठेवा. मोड आले की, त्याची सालं काढून पावटे पाण्यात ठेवा.

२) एका भांड्यात तेल तापवून त्यात मोहरी, हळद व हिंग घालून फोडणी करून घ्या. त्यात लाल तिखट घाला व लगेचच पावटे घाला. आवश्यकतेनुसार पाणी घाला व पावटे शिजवून घ्या.

३) खोवलेल्या नारळात थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पेस्ट करून घ्या. तयार पेस्ट शिजवलेल्या पावट्यात घाला. आवश्यकतेनुसार पुन्हा थोडे पाणी घाला.

४) तयार उसळीत आमसूलं, गूळ व चवीनुसार मीठ घालून ३-४ मिनिटे शिजवा.

५) तयार उसळ सर्व्ह करा.(तयार उसळ सर्व्ह करतांना १ चमचा दही घातल्याने चव मस्तच लागते.)



Comments

Popular Posts