गोळीचे पिठलं/भुरटं पिठलं

महाराष्ट्रात पिठलं-भाकरी सगळीकडे केली जाते. पटकन होणारा पौष्टिक व पोटभर असा पारंपारिक प्रकार. रावण पिठलं, कोरडं पिठलं, कांदा घालून केलेले पातळ पिठलं, ताकातलं पिठलं, टोमॅटोचे पिठलं, भुरटं/गोळीचे पिठलं, पीठ भाजून केलेले पिठलं असे पिठल्याचे अनेक प्रकार महाराष्ट्रात  केले जातात, पण सगळ्यांची चव मात्र वेगळी. आज मी भुरटं/गोळीचे पिठल्याची कृती देत आहे. भुरटं पिठलं / गोळीचं पिठलं करतांना फोडणी करून त्यात पाणी घालायचं पाण्याला उकळी आली की, पीठ वरून भुरभुरायचं पिठाच्या गुठळ्या होतात व शिजल्यावर छान लागतात, ५-१० मिनिटात पिठलं तयार. मी पिठलं  करतांना लोखंडी कढई वापरते. अगदी लहानपणापासून मी भुरटं पिठलं हेच नाव ऐकलं आहे.

साहित्य:
  • ४-५ टेबलस्पून चणाडाळीचे पीठ
  • ४-५ लसुण पाकळ्या
  • १-२ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
  • ५-६ कडिपत्याची पानं
  • १-२ आमसुलं
  • १ ग्लास पाणी
  • चवीनुसार मीठ
  • खोवलेला नारळ व बारीक चिरलेली कोथिंबीर

फोडणीकरिता:

  • २ टेबलस्पून तेल
  • १/४ चमचा मोहरी
  • १/४ चमचा हळद
  • चिमुटभर हिंग
कृती:

१) एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी, जिरं, हळद व चिमुटभर हिंग घालून फोडणी करा. त्यात बारीक चिरलेला लसुण, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कडिपत्याची पानं घाला. फोडणीत १ ग्लास पाणी घाला. पाणी उकळले की त्यात चवीनुसार मीठ घाला.

२) उकळलेल्या पाण्यात थोडे-थोडे चणाडाळीचे पीठ भुरभुरून टाका व ढवळा पिठाच्या गुठळ्या  झाल्या पाहिजेत. पिठलं खुप घट्ट होणार नाही याची काळजी घ्या. त्यात १-२ आमसुल॔ घाला. ४-५ मिनिटांनी पिठल्याला उकळी आली की, गॅसवरून उतरवा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर व खोवलेला नारळ घाला.

३) गरमागरम पिठलं भाताबरोबर किंवा भाकरी/ पोळी बरोबर सर्व्ह करा.





Comments

Popular Posts