व्हेज फ्रँकी

हल्ली तरूण पिढीतील मुला-मुलींचा आवडता चटपटीत मेनू म्हणजेच व्हेज फ्रँकी. बऱ्याच ठिकाणी सहज उपलब्ध होणारा व पोटभरीचा  पदार्थ. माझ्या मुलींकरिता टीफिनचा आवडता मेनू . व्हेज फ्रँकी करतांना मी मैद्याचा वापर टाळते त्याऐवजी गव्हाचे पीठ वापरते. व्हेज फ्रँकीची पोषकता वाढावी म्हणून तुम्ही यात १-१ चमचा चणाडाळीचे पीठ, सोयाबीनचे पीठ मिसळून पोळी करू शकता.  भाजीमध्ये उकडलेले मटार, स्वीट कॉर्न, पनीर घालू शकता, त्यामुळे मुलांच्या आहारात भाज्यांचा समावेश होतो. आपल्या आवडीनुसार भाज्या वापरून व्हेज फ्रँकी करून पहा. दिलेल्या साहित्यात ७-८ व्हेज फ्रँकी तयार होतात. 

व्हेज फ्रँकी

साहित्य:

  • ५-६ उकडलेले बटाटे
  • १ गाजर बारीक चिरून
  • १/२ वाटी चिरलेली फरसबी
  • १/२ वाटी चिरलेली कोथिंबीर
  • १ मध्यम कांदा बारीक चिरून
  • १ लहान सिमला मिरची चिरून
  • १ मध्यम टोमॅटो चिरलेला
  • १ मोठी वाटी चिरलेला कोबी
  • १/२ चमचा चिली फ्लेक्स / लाल तिखट
  • १/२ चमचा आमचुर
  • २-३ चमचे फ्रँकी मसाला
  • थोडीशी हळद
  • मीठ चवीनुसार
  • बटर आवश्यकतेनुसार
  • १/२ वाटी तेल
  • चीझ क्युब २-३
  • किंचित खायचा सोडा 
  • टोमॅटो साॅस आवश्यकतेनुसार ( शेझवान साॅससुद्धा वापरू शकता.)

कव्हरकरिता:
  • गव्हाचे पीठ २ ते ३ वाट्या (आवडीनुसार मैदा वापरू शकता.)
  • थोडेसे तेल
  • मीठ चवीपुरते

कृती:

१) थोडे मीठ व किंचित खायचा सोडा घालुन गाजर व फरसबी पाण्यात शिजवून घ्या.

२) एका कढईत तेल तापवा. त्यात चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परता. त्यात चिरलेली सिमला मिरची 
घालून परता. टोमॅटो, वाफवलेले गाजर व फरसबी घालून  थोडे परता. चिरलेला कोबी व कोथिंबीर घालुन मिश्रण एकत्र करा.

३) उकडलेल्या बटाट्याची सालं काढून बटाटे मॅश करून वरील मिश्रणात घालुन मिश्रण एकत्र करा.

४) चिली फ्लेक्स/ लाल तिखट, आमचुर, फ्रँकी मसाला, थोडीशी हळद व चवीनुसार मीठ घाला. तयार भाजी एका भांड्यात काढून ठेवा. 

४)कव्हरकरिता २-३ वाट्या गव्हाचे पीठ, थोडेसे तेल व चवीपुरते मीठ घालुन घट्ट कणिक भिजवुन घ्या. त्याचे गोळे करून पातळ पोळ्या लाटून ठेवा. 

५) तवा तापवुन त्यावर पोळीच्या दोन्ही बाजुंना बटर लावून पोळी शेका. पोळी उलटुन एका बाजुला टोमॅटो साॅस लावुन तयार भाजी मधोमध भरा. भाजीवर चिझ किसुन घाला पोळीचा रोल करा. पोळीला पुन्हा थोडे बटर लावुन शेका.

६) तयार फ्रँकी वर थोडे किसलेले चीझ घालून गरमा-गरम टोमॅटो साॅस बरोबर सर्व्ह करा.





Comments

Popular Posts