गोळ्यांची आमटी

माझ्या आईने मला बरेच पदार्थ करायला शिकवले. खूप जणांना माहित असणारी व एक पारंपारिक अशी मला आवडणारी गोळ्यांची आमटी. मस्त तिखट खावेसे वाटले कि, मी आवर्जून गोळ्यांची आमटी  करते. तयार गोळ्यांवर लसणीची झणझणीत फोडणी घालुन पोळीबरोबर खाता येतातच पण आमटी भातसुद्धा मस्त लागतो. भाजी केली नाही तरी चालते. काही जण यात नुसत्या चणाडाळीच्या पिठाचे गोळे किंवा तूरडाळ भिजवून त्याचे गोळे तळून घालतात पण मला चणाडाळ व चणाडाळीचे  पिठ वापरून  करायला आवडतात. चला तर मग रेसिपीकडे वळूया. 

गोळ्यांकरिता साहित्य:
  • १ वाटी भिजवलेली चणाडाळ
  • चणाडाळीचे पीठ आवश्यकतेनुसार
  • १/२ टी. स्पून लाल तिखट
  • १/४ टी . स्पून  हळद
  • चिमूटभर हिंग 
  • थोडेसे तेल 
  • मीठ चवीनुसार 

कृती :

१)भिजवलेली  चणाडाळ मिक्सरवर बारीक वाटुन घ्या. त्यात हळद, हिंग, थोडेसे तिखट ,मीठ घाला. पिठाचे गोळे होतील इतके चणाडाळीचे पीठ घाला. हाताला थोडेसे तेल लावुन छोटे गोळे करुन घ्या.

२) वरील गोळ्यांच्या पीठातील १/२ वाटी पीठ बाजुला ठेवुन उरलेल्या पिठाचे गोळे करून गरम तेलात तळुन घ्या. तळलेले गोळे बाजूला ठेवा.


मसाल्याकरिता साहित्य:
  • १ कांदा उभा चिरून
  • २ टे. स्पून भिजवलेली चणाडाळ
  • २-३ हिरव्या मिरच्या
  • ५-६ लसुण पाकळ्या
  • थोडेसे आलं
  • १/२ वाटी किसलेले सुके खोबरं
  • थोडेसे लाल तिखट
  • थोडीशी हळद
  • १-२ चमचे गोडा मसाला
  • १-२ चमचे धने पूड
  • १/२ चमचा जिरंपूड
  • मीठ चवीनुसार

कृती:

१) एका कढईत २ चमचे तेल तापवून त्यात उभा चिरलेला कांदा परतून घ्या. त्यात २ टे. स्पून भिजवलेली चणाडाळ, हिरव्या मिरच्या, लसुण पाकळ्या व थोडेसे आलं घालुन परता. एका ताटलीत काढा. 

२) नंतर सुके खोबरं भाजून घ्या.

३) वरील साहित्य एकत्र करून त्यात लाल तिखट ,थोडीशी हळद, गोडा मसाला, धनेपूड व जिरंपूड
घालून मिश्रण मिक्सरमध्ये वाटा. तयार मसाला एका भांड्यात काढा. 

फोडणीकरिता:

  • ३-४  टे. स्पून तेल
  • १/४ टी स्पून मोहरी  
  • थोडेसे लाल तिखट 
  • थोडीशी हळद 
  • चिमूटभर हिंग
  • गुळाचा लहान खडा 
  • मीठ चवीनुसार 


१) एका कढईत ३-४ टे. स्पून तेल तापवा. त्यात मोहरी, हिंग, हळद, थोडेसे लाल तिखट घालुन फोडणी करा. त्यात १/२ वाटी बाजुला काढलेले मिश्रण घालुन परता. वाटलेला मसाला घालून परता.  मिश्रण कोरडे होत आले की , त्यात ४-५ वाट्या पाणी घाला. मिश्रणाला चांगली  उकळी येऊ द्या.

२) गुळाचा लहान खडा व चवीनुसार मीठ घाला . मिश्रण दाटसर झाले कि, त्यात तळलेले गोळे घालून थोडेसे उकळा. गरमागरम सर्व्ह करा.  

सर्व्ह करतांना तयार गोळे एका वाटीत फोडून त्यावर लसणीची झणझणीत फोडणी घालून सर्व्ह करा. पोळीबरोबर फोडणी घातलेले गोळे खूप छान लागतात. 





रेसिपि आवडली तर कंमेंट व लाईक नक्की करा. 

Comments

Popular Posts