छोले-पुरी

छोले 
साहित्य:
  • काबुली चणे २ वाट्या ( अंदाजे १५०-२०० ग्राम. काबुली चणे पाण्यात ७-८ तास भिजवा.)
  • १ मोठा टोमॅटो चिरलेला
  • १ चमचा छोले मसाला
  • थोडीशी हळद
  • थोडेसे लाल तिखट (आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता.)
  • १-२ तमालपत्राची पानं
  • १ लहान चमचा साखर
  • मीठ चवीनुसार
  • फोडणीकरिता तेल (आवश्यकतेनुसार )

वाटलेला मसाला:

  • १ चमचा धनेपूड
  • १/२ चमचा जिरंपूड
  • १/२ इंच आलं
  • २-३ हिरव्या मिरच्या (आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता.)
  • ५-६ लसुण पाकळ्या
  • १ मध्यम दालचिनी तुकडा
  • १-२ मसाला वेलची
  • ५-६ लवंगा
  • २ मध्यम कांदे (उभे चिरून १ चमचा तेलावर परता.)

कृती:

१) भिजवलेल्या काबुली चण्यात थोडे पाणी, मीठ व सोडा घालुन कूकरमध्ये मऊ शिजवून घ्या.

२) मिक्सरच्या भांड्यात दालचिनीचा तुकडा, मसाला वेलची, लवंगा, धनेपूड, जिरंपूड बारीक वाटा. त्यात आलं, हिरव्या मिरच्या, लसुण पाकळ्या, परतलेला कांदा व थोडेसे पाणी घालुन मसाला बारीक वाटुन घ्या.

३) एका कढईत २-३ डाव तेल तापवा त्यात १ लहान चमचा साखर घाला. थोडेसे लाल तिखट, थोडीशी हळद, १-२ तमालपत्राची पानं व वाटलेला मसाला, छोले मसाला घालून परता. तेल सुटू लागले की, त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून परता. टोमॅटो एकजीव होईपर्यंत परता.  त्यात १/२ वाटी शिजवलेले काबुली चणे मिक्सरमध्ये भरड वाटुन घाला व परता.

४) शिजवलेले काबुली चणे, चवीनुसार मीठ व आवश्यकतेनुसार २-३ वाट्या पाणी घालून थोडा वेळ उकळवा व दाटसर ग्रेव्ही करा .  

पुरी :
साहित्य:

  • गव्हाचे पीठ  ३ वाट्या 
  • मुठभर जाडा रवा 
  • २ टे. स्पून चणाडाळीचे पीठ 
  • १/२ चमचा साखर 
  • चवीपुरते मीठ 
  • तळण्यासाठी तेल 

कृती :
एका भांड्यात ३ वाट्या गव्हाचे पीठ  घ्या. त्यात मुठभर जाडा रवा , २ टे. स्पून चणाडाळीचे पीठ, १/२ चमचा साखर व चवीपुरते मीठ  घाला. त्यावर २ टे. स्पून गरम  तेलाचे मोहन घालून घट्ट कणिक भिजवा. पुऱ्या लाटून तेलात तळा. 



गरम-गरम पुऱ्या व छोले कांदा व लिंबू घालुन सर्व्ह करा.(आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.)

Comments

Popular Posts