टोमॅटो ऑम्लेट (धिरडे)

सकाळी सकाळी सर्व गृहिणींना पडणारा सामान्य प्रश्न म्हणजे रोज-रोज खायला काय वेगळा पदार्थ करावा? हल्ली मुलांना खायला जरा हटकेच प्रकार लागतो. मग आईची कसोटी पणालाच लागते. आईसमोर मग रोज नविन शक्कल लढवुन मुलांना आवडणारे परंतु पौष्टिक पदार्थ करायचे आव्हान असते. प्रत्येक आई वैविध्य असणारे प्रकार शोधून काढते व मुलांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करते. आजचा पदार्थ बहुतेक सगळ्यांना माहिती असेलही व करण्यासाठी लागणारे साहित्य बहुतेक घरी उपलब्ध असतेच. माझ्या आईने शिकवलेल्या या पदार्थाची रेसिपी शेअर करते. पहा आवडते का तुम्हाला.

साहित्य:
  • ४-५ लालबुंद टोमॅटो
  • १ टोमॅटो बारीक चिरलेला
  • १ मध्यम कांदा बारीक चिरलेला
  • १ चमचा आलं लसुण व मिरचीची  पेस्ट (कमी-जास्त आवडीनुसार )
  • चणाडाळीचे पीठ आवश्यकतेनुसार
  • थोडेसे लाल तिखट
  • थोडीशी हळद 
  • मीठ चवीनुसार
  • १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर( ऐच्छिक)
  • १/२ वाटी तेल
कृती:

१) टोमॅटो धुवून घ्या. टोमॅटोचे ३-४ तुकडे करून मिक्सरमध्ये टोमॅटोचा रस काढून घ्या.

२) टोमॅटोच्या रसामध्ये १ बारीक चिरलेला कांदा, १ बारीक चिरलेला टोमॅटो, थोडेसे लाल तिखट, थोडीशी हळद व १ चमचा आलं लसुण व मिरची पेस्ट घालुन सगळे मिश्रण एकत्र करा. त्यात मावेलइतकं चणाडाळीचे पीठ घाला. थोडे पाणी व चवीनुसार मीठ घालून मिश्रण सारखे करा. पीठ पळीवाढे झाले पाहिजे.

३) बीडाचा तवा किंवा नाॅन-स्टीक चा तवा वापरा. तव्याला थोडे तेल लावून छोटे-छोटे टोमॅटो ऑम्लेट (धिरडे) घाला. थोडेसे तेल कडेने सोडून दोन्ही बाजुंनी शेका. (मध्यम आंचेवर ) 

४) टोमॅटो (धिरडे) ऑम्लेट साॅस व चटणीबरोबर गरमागरम सर्व्ह करा.

टोमॅटो ऑम्लेट (धिरडे) करतांना तुटले तर थोडेसे चणाडाळीचे पीठ घालुन ढवळा व करा. चणाडाळीचे पीठ खुप घालु नका. चणाडाळीचे पीठ जास्त झाले तर टोमॅटोची चव लागत नाही. बारीक चिरलेली कोथिंबीर आवडत असल्यास घाला.

रेसिपी आवडली तर ब्लाॅगवर लाईक व कमेंट नक्की करा.





Comments

Popular Posts