कारल्याची रसभाजी (चिंच-गुळ घालून)
कारली चवीने कडू असली तरी आरोग्याकरिता उपयुक्त अशी फळभाजी. कारल्याच्या कडूपणामुळे खुप जण कारली खाण्यास नापसंती दर्शवतात. कारल्याच्या भाजीत तीळ व हिरव्या मिरच्या घालून परतुन खुप वेळा केली जाते. माझी आई चिंच गुळ घालून कारल्याची रसभाजी करायची. कारल्याचा कडूपणा कमी जाणवतो. पाहू या कारल्याची चिंच गुळ घालून केलेली रसभाजी.
साहित्य:
- २५० ग्रॅम मध्यम आकाराची कारली
- १/२ वाटी खोवलेला नारळ
- ३ टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट
- २ टीस्पून धनेपुड
- १ टेबलस्पून गोडा मसाला
- १ टीस्पून लाल तिखट
- १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
- १/४ वाटी बारीक चिरलेला गुळ
- १/२ वाटी चिंचेचा कोळ
- १ वाटी बारीक चिरलेला कांदा
- चवीनुसार मीठ
- २-३ टेबलस्पून तेल
- थोडीशी मोहरी, हिंग, हळद
कृती:
१) कारली स्वच्छ धुवून घ्या. कारल्याची देठं काढून त्याचे छोटे छोटे ३-४ तुकडे करून त्यातील बिया काढून घ्या. एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात कारल्याचे तुकडे, थोडी हळद व मीठ घालून कारली शिजवून घ्या.
२) एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करून बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या. खोवलेला नारळ, शेंगदाण्याचं कूट, धनेपुड, गोडा मसाला, लाल तिखट, गुळ, कोथिंबीर, चिंचेचा कोळ, उकडलेली कारली पाण्यातून काढून घाला व परता, थोडेसे पाणी घाला व मिश्रण एकत्र करून घ्या. चवीनुसार मीठ घाला. २-३ मिनिटे भाजी शिजवा. घट्टसर झाल्यावर गॅस बंद करा. तयार भाजीवर कोथिंबीर घालून गरमा-गरम पोळी बरोबर सर्व्ह करा.
Comments
Post a Comment