ओल्या हळदीचे लोणचं /Turmeric pickle/ Olya Haldiche Lonache

हळदीचे अनेक फायदे आहेत. भारतात लग्नाच्या वेळी वधु वरांना हळद लावली जाते. आपल्या भारतीय जेवणातसुध्दा हळदीला खुप महत्व आहे. हळद जंतूनाशक असून रोगप्रतिकारक सुध्दा आहे. हळद व साय लावल्याने वर्ण सुधारतो. सर्दी खोकला झाल्यावर देखील गरम दूध व हळद गुणकारी ठरते. अलिकडे झालेल्या संशोधनात हळदीचा वापर कॅन्सर, मधुमेह, ह्रदयविकार इ. विकारांवरील औषधे बनविण्यासाठी केला जातो. अशी ही बहुगुणी हळद.

थंडी सुरू झाली की, बाजारात ओली हळद, आंबेहळद, लिंब-आवळे मिळू लागतात. ओल्या हळदीचं लोणचं करतांना, ओली हळद किसतांना हात पिवळे होतात म्हणून ग्लोव्हज किंवा प्लास्टिकची पिशवी हातात घालून हळद किसावी. ओल्या हळदीचे लोणचं करायची रेसिपी देत आहे आवडली तर लाईक व कमेंट नक्की करा.


ओल्या हळदीचे लोणचं 

साहित्य:

  • २०० ग्रॅम किसलेली ओली हळद (ओली हळद स्वच्छ धुवून, पुसून व सोलाण्याने सालं काढून किसून घ्यावी.)
  • १/४ वाटी  आंबेहळद (ऐच्छिक) (ओली हळद विकणा-याकडेच आंबेहळद मिळते. ती पण सोलून व किसून घ्यावी.)
  •  आवडत असेल तर १/४ वाटी किसलेले आलं सुध्दा घालू शकता. 
  • ७-८ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
  • २-३ लिंबाचा रस ( मध्यम आकाराची)
  • ३ टेबलस्पून लोणचं मसाला
  • मीठ चवीनुसार
फोडणीकरिता:

  • २ टेबलस्पून तेल 
  • १/४ टीस्पून मोहरी व थोडासा हिंग

कृती:
१) एका भांड्यात किसलेली हळद, आंबेहळद, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, लिंबू रस, लोणचं मसाला व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या.

२) एका छोट्या कढईत तेल तापवून त्यात मोहरी हिंग घालून फोडणी करा. फोडणी गार झाल्यावर हळदीच्या मिश्रणात घालून मिश्रण एकत्र करून घ्या.

३) १-२ दिवसांनी लोणचं चांगले मुरते. लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी फ्रिझमध्ये ठेवावे.


४) तयार लोणचं सर्व्ह करा.




Comments

Popular Posts