चवळीची उसळ

आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या कडधान्यांचा आपल्या आहारात समावेश केला जातो. बहुतेक सगळ्यांनाच कडधान्ये खायला आवडतात. कडधान्यांचा वापर करून पौष्टिक भाजणी केली जाते व त्याची थालीपीठं किंवा भाजणीचे वडे केले जातात. भाज्या उपलब्ध नसतांना गृहिणीच्या मदतीला कडथान्येच येतात. मिसळ करतांना देखील मटकी व वाटाण्याशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही. रगडा पॅटीस करायला पांढरे वाटाणे तर अगदी चाट करतांना देखील हिरवे मूग किंवा हरभरे हवेच. कडधान्ये शिजवतांना उरलेल्या पाण्याचे ताक घालून केलेले कढण पौष्टिक तर असतेच पण खुप चविष्टही लागते.
माझी आई मोड आलेल्या चवळीची उसळ करायची. आज चवळीच्या उसळीची रेसिपी देत आहे आवडली तर लाईक व कमेंट नक्की करा.

साहित्य:

  • २०० ग्रॅम मोठी चवळी
  • १ मध्यम कांदा बारीक चिरलेला
  • १ मध्यम टोमॅटो बारीक चिरलेला
  • १/४ वाटी खोवलेला नारळ
  • ५-६ कढिपत्याची पानं
  • १-२ आमसूलं
  • २ टीस्पून गोडा मसाला
  • २ टीस्पून गूळ
  • थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • मीठ चवीनुसार

फोडणीकरिता :

  • तेल ३ टेबलस्पून
  • १/४ चमचा मोहरी
  • १/४ चमचा हळद
  • २ टी स्पून तिखट (आवडीनुसार लाल तिखट कमी-जास्त प्रमाणात वापरा.)

कृती:

१) प्रथम मोठी चवळी ७-८ तास भिजवून त्याला मोड येण्याकरिता चाळणीत उपसून ठेवा. मोड आले की, चवळी थोडा वेळ पाण्यात ठेवून त्याची सालं काढून घ्या.

२) एका भांड्यात तेल तापवून त्यात मोहरी, हळद, हिंग व कढीपत्ता घालून फोडणी करून घ्या. त्यात चिरलेला कांदा घालून परता. कांदा लालसर झाल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून परता. लाल तिखट, खोवलेला नारळ व सोललेली चवळी घाला. आवश्यकतेनुसार पाणी घाला. भांड्यावर झाकण ठेवून, झाकणावर पाणी ठेवून चवळी शिजवून घ्या.

३) तयार उसळीत आमसूलं, गूळ व चवीनुसार मीठ घालून ३-४ मिनिटे शिजवा.

५) बारीक चिरलेली कोथिंबीर घालून तयार उसळ सर्व्ह करा.


Comments

Popular Posts