वडा-सांबार-चटणी

साहित्य: 
  • २ वाट्या उडिदडाळ 
  • थोडेसे मीठ 
  • थोडे पाणी
कृती:

१) उडिदडाळ ४५-५० मिनिटे भिजवून थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटावे.  डाळ वाटतांनाच थोडे मीठ घाला. (डाळ कमी वेळ भिजवल्याने तळतांना तेल कमी लागते व वडे तेलकट होत नाही.)

२) तयार पीठाला पाण्याचा हात लावून वडा करून भोक पाडून एक-एक वडे करा व एका कढईत तेल तापवून मध्यम आचेवर वडे तळा. वडे हाताने करता येत नसतील तर गोलाकार चमचा पाण्यात बुडवून घ्या, नंतर तयार पीठात बुडवून एक-एक चमचा पीठ घेऊन एक-एक वडा करून गरम तेलात वडे सोडून सोनेरी रंगावर वडे तळा. ( चमचा पाण्यात बुडवल्यामुळे पीठ चमच्याला चिकटत नाही.)
(आपल्या आवडीनुसार मेदूवड्याच्या पीठामध्ये ओल्या खोब-याचे काप व आल्याचे तुकडे घालू शकता.)

सांबार

साहित्य:

  • १ वाटी तूरडाळ,
  • १ वांग (चिरलेले)
  • १ कांदा ( उभा चिरुन)
  • १ टोमॅटो (चिरलेला)
  • १-२ शेवग्याच्या शेंगा ( तुकडे करून)
  • ५-६ कडिपत्याची पानं
  • १/२ वाटी चिंचेचा कोळ
  • एक गूळाचा लहान खडा
  • १ चमचा लाल तिखट
  • १ मोठा चमचा सांबार मसाला
  • मीठ चवीनुसार
  • फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद,

कृती:

१) तूरडाळ धुवून घ्यावी. तूरडाळीमध्ये चिरलेला टोमॅटो, चिरलेले वांग, शेवग्याच्या शेंगांचे तुकडे व कांदा घालून कुकरमध्ये शिजवून घ्या.

२) एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट, कडिपत्याची पानं घाला. त्यात शिजवलेली तुरीची डाळ रवीने घोटून घाला.

३) चिंचेचा कोळ, सांबार मसाला, गुळ व चवीनुसार मीठ घाला. आवश्यकतेनुसार पाणी घालून सांबार उकळून घ्या.

नारळाची चटणी:

साहित्य:

  • १ वाटी खोवलेला नारळ
  • २-३ लसुण पाकळ्या
  • १-२ हिरव्या मिरच्या
  • १/२ वाटी चिरलेली कोथिंबीर
  • ७-८ कडिपत्याची पाने
  • १/२ चमचा जिरं
  • थोडेसे आलं
  • १/२ लिंबाचा रस / १ चमचा दही
  • १/२ चमचा साखर
  • मीठ चवीनुसार
कृती:

वरील साहित्य एकत्र करून चटणी वाटा. आवडत असल्यास १ टे. स्पुन तेल तापवून त्यात थोडे जिरं, मोहरी, हिंग व ३-४ कडिपत्याची पाने घालून फोडणी करा व चटणीवर घाला.

तयार वडे सांबार व चटणी बरोबर सर्व्ह करा.





Comments

Post a Comment