नारळाची दिंडं

नागपंचमी हा श्रावण महिन्यात येणारा पहिला सण. घरोघरी पाटावर चंदन व हळद वापरून नाग, नागिण व त्यांची पिल्ले काढून विविध प्रकारची पत्री व दूर्वा वाहून त्यांची पूजा करून दुध व लाह्यांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. नागपंचमीला पुरणाची किंवा नारळाची दिंडं करण्याची पध्दत आहे. नागपंचमीला उकडलेले पदार्थ करून खाल्ले जातात.

साहित्य:

कव्हरकरिता:

  • ३ वाट्या गव्हाचे पीठ 
  • १ चमचा रवा
  • १ टेबलस्पून तेल 
  • चिमुटभर मीठ 

सारणासाठी:

  • १ खोवलेला नारळ 
  • दिड वाटी चिरलेला गूळ 
  • १/४ चमचा वेलची पूड 
  • १ टीस्पून साजूक तूप 

कृती:

१) एक कढई तापत ठेवून त्यात १ टीस्पून साजूक तूप घाला. त्यात खोवलेला नारळ व गुळ एकत्र करून घ्या.  नारळ व गुळाचे मिश्रण कोरडे होईपर्यंत परता.(मोदकाच्या सारणाप्रमाणे) 
त्यात वेलची पूड घालून मिश्रण सारखे करून घ्या. तयार सारण एका भांड्यात काढून घ्या.

२) गव्हाचे पीठ, रवा व मीठ एकत्र करून त्यात १ टेबलस्पून तेलाचे मोहन घालून कणिक घट्ट भिजवून घ्या. तयार कणकेच्या, पुरी करताना करतो तसे लहान गोळे करून पु-या लाटून घ्याव्यात.

३) तयार पुरीमध्ये १ चमचा सारण भरा. दिंडाचा आकार देऊन दिंडं तयार करून चाळणीत ठेवून कुकरमध्ये/ पातेल्यात पाणी ठेवून १०-१२ मिनिटे वाफवून घ्या.

४) गरमा-गरम दिंड साजूक तूप घालून सर्व्ह करा.





Comments

Popular Posts