भातावरचे पिठले

कदाचित आजची रेसिपी कोणाला माहीत असेलही तरी आज मी 'भातावरचे पिठलं' ही एक पारंपारिक रेसिपी देत आहे. मला आईने व माझ्या आईला आजीने शिकवलेली रेसिपी. सगळे साहित्य बहुतेक घरात असतेच. एकाच पातेलीत भात व कोरडे पिठले तयार होते. पोळी बरोबर पिठले खाऊ शकतो व भात खाण्यासाठी दही/ ताक घ्यावे.

साहित्य:

  • तांदुळ एक वाटी
  • चणाडाळीचे पीठ दिड वाटी 
  • लाल तिखट एक ते दिड टी स्पून
  • शेंगदाण्याचे कुट २ टी. स्पून
  • फोडणीकरिता तेल आवश्यकतेनुसार
  • मोहरी १/४ चमचा
  • हळद १/२ चमचा
  • हिंग चिमूटभर
  • खरवडलेला नारळ १/४ वाटी 
  • बारीक चिरलेली कोथिंबीर १/४ वाटी 
  • ६-७ कढीपत्याची पाने
  • १-२ हिरव्या मिरचीचे तुकडे
  • मीठ चवीनुसार

कृती :


१) तांदुळ धुवून घ्या.

२) एक जाड बुडाची किंवा पितळी पातेली घ्या ती जरा मोठी असावी, म्हणजे त्यात भात तयार झाला की अर्धे पातेले रिकामे राहील. पातेलीत पाणी उकळत ठेवा, पाणी उकळले की त्यात धुतलेले तांदुळ घाला व थोडेसे मीठ घाला. भात शिजु द्या.

३) एका भांड्यात डाळीचे पीठ, थोडी हळद, लाल तिखट,शेंगदाण्याचे कुट, मीठ, हिंग घाला व पाणी घालुन भज्याकरीता जसे पीठ भिजवतो तसे भिजवून पीठ तयार ठेवा.

३) भाताचे शीत शिजत आले व भातातील पाणी आटले की, गॅस मंद करावा. आता तयार कालवलेले डाळीचे पीठ भातावर अलगद ओतावे.

४) आता हे पातेले कुकरमध्ये ठेवा. पातेलीवर झाकण ठेवावे. कुकरच्या ३ शिट्या कराव्यात किंवा पातेल्यावर झाकण ठेवुन १०-१५ मिनिटे पातेली तव्यावर ठेवु शकता डाळीचे पीठ शिजले पाहिजे व भात लागणार नाही याची काळजी घ्यावी.

५) कुकर गार झाला की, पातेली खाली उतरवून घ्या.

६) एका कढईत तेल तापवा. त्यात जिरं-मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ता, हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. तयार फोडणी पातेलीत टाका. वरून थोडी कोथिंबीर व थोडा खरवडलेला नारळ घालून सजवा.

७) गोड दह्याबरोबर गरम-गरम सर्व्ह करा.








Comments

Popular Posts