गूळाच्या पोळ्या/ Gul-Poli

मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा.

गूळाची पोळी महाराष्ट्रात संक्रांतीला केला जाणारा गोड पदार्थ.  आज गूळाच्या पोळीची रेसिपी देत आहे. गूळाच्या पोळीचे सारण मला माझ्या चुलत सासूबाईंनी शिकवले. मी ते हल्ली फूड प्रोसेसर मध्ये करते. त्यामुळे माझा वेळ तर वाचतोच पण श्रम ही कमी होतात. तुम्ही पण फूड प्रोसेसरचा वापर करून बघा. तसेच हल्ली बाजारात गूळाची पावडर मिळते ती वापरली तर गूळ कुटून,चिरून किंवा किसून घेण्याचा त्रास वाचतो. त्यामुळे गूळाची पोळी करणे सोपे जाते.

साहित्य:

सारणासाठी:
  • ३/४ वाटी चणाडाळीचे पीठ
  • दिड वाटी तीळाचे कूट ( तीळ भाजून मिक्सरमध्ये बारीक कूट करावे.)
  • अडीच वाट्या बारीक चिरलेला गूळ/ गूळाची पावडर
  • १/२ चमचा वेलची पूड
  • १/२ वाटी तेल 
कृती:

१) एका कढईत ३-४ चमचे तेल घालून चणाडाळीचे पीठ खरपूस भाजून घ्यावे.( पीठ थोडे कोरडे असावे)

२)भाजलेले चणाडाळीचे पीठ, तीळाचे कूट, वेलची पूड व बारीक चिरलेला गूळ एकत्र करून मिश्रण फूड प्रोसेसरच्या मोठ्या भांड्यात एकत्र करून फिरवून घ्या.
(फूड प्रोसेसर मध्ये हे सारण पटकन व छान मोकळे होते.)

कव्हरकरिता:

साहित्य:
  • ३ वाट्या गव्हाचे पीठ
  • १/४ चमचा मीठ
  • थोडेसे तेल
  • पाणी कणिक भिजवण्यासाठी
कृती:

१) गव्हाचे पीठात थोडे मीठ घालून एकत्र करा. पाणी घालून मऊसर कणिक भिजवून घ्या त्यात थोडेसे तेल घालून कणिक मळा. १५-२० मिनिटे कणिक भिजवून ठेवा.

२) वरील कणकेचा मध्यम गोळा घ्या. त्याची खोलगट वाटी करून त्यात सारण भरा. थोडी पीठी लावून हलक्या हाताने पोळी लाटा. दोन्ही बाजूंनी मध्यम आचेवर पोळी भाजून घ्या.

३) साजूक तूपाबरोबर गुळाची पोळी सर्व्ह करा.


रेसिपी आवडली तर लाईक व कमेंट नक्की करा.

Comments

Popular Posts