मुळाच्या शेंगांची भाजी

बाजारात मुळाच्या शेंगा मिळतात. मुळाच्या शेंगांना 'डिंगरी' पण म्हणतात. डिंगरी किंवा मुळ्याच्या शेंगा वातनाशक, गुणाने उष्ण पण उत्तम पाचक असतात असे माझ्या वाचनात आले आहे. आज मुळाच्या शेंगांच्या भाजीची रेसिपी देत आहे.

साहित्य: 

  • २ वाट्या मुळाच्या शेंगा
  • १ मध्यम बारीक चिरलेला कांदा
  • १-२ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
  • ५-६ ठेचलेल्या लसुण पाकळ्या
  • १/२ वाटी खोवलेला नारळ
  • १/२ चमचा साखर 
  • फोडणीसाठी २ टेबलस्पून तेल
  • १/४ चमचा हळद
  • १/४ चमचा मोहरी
  • चिमुटभर हिंग
  • मीठ चवीनुसार

कृती:

१) एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, हळद हिरव्या मिरच्यांचे तुकडे व ठेचलेला लसुण घाला. लसुण लालसर झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परता.

२) कांदा परतून झाल्यावर त्यात निवडलेल्या मुळ्याच्या शेंगा घाला. खोवलेला नारळ, साखर व चवीनुसार मीठ घालून ढवळा. 


३) कढईवर झाकण ठेवून भाजी वाफवा.

४) भाजी शिजल्यावर झाकण काढून कोरडी होईपर्यंत परता.

५) भाकरी किंवा पोळीबरोबर सर्व्ह करा.




Comments

Popular Posts