ज्वारीचे थालीपीठ /Sorghum Thalipeeth (Flatbread)
# ज्वारीचे थालीपीठ # महाराष्ट्रात सोलापूर जिल्हयात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तिथे मिळणारी ज्वारीची कडक भाकरी प्रसिद्ध आहे. ज्वारीचा वापर भाकरी, लाह्या, पापड, आंबील, उकडपेंडी व थालीपीठासारखे पदार्थ करण्यासाठी केला जातो. हल्ली शहरी जीवनाच्या धावपळीमध्ये आपल्या आहारात पोळी खाण्याचे प्रमाण वाढले आहे. भाकरी खाण्याचे प्रमाण ग्रामीण भागाच्या तुलनेपेक्षा शहरी भागामध्ये कमी आहे. ज्वारी पचनास सोपी असून आरोग्यास गुणकारी व लाभदायक असते. ज्वारीमध्ये प्रथिने, पिष्टमय पदार्थ, शर्करा व खनिजद्रव्ये अधिक प्रमाणात आढळतात असे माझ्या वाचनात आले आहे. अश्या या गुणकारी ज्वारीचे सेवन आपण आपल्या आहारात नक्कीच वाढवले पाहिजे नाही का? भाकरी करण्यापेक्षा ज्वारीचे थालीपीठ हा एक उत्तम प्रकार असून कमी वेळात तयार होतो . ज्वारीच्या पीठाचे थालीपीठ खूप चविष्ट लागते व मला अतिशय आवडते. भुक लागली की, माझी आई मला ते पटकन करून द्यायची. 'गरम-गरम', 'चुरचुरीत' असे थालीपीठ आणि त्याबरोबर दही, लोणचं आणि घरचं कणीदार तूप असायचं. माझी आई उत्तम सुगरण होती. ती नेहमीच वेगवेगळे...